सकाळी लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली. मिरवणूक भारतमाता जवळ येताच राजावर पुष्पवृष्टी केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी रस्त्यावर तसेच आसपासच्या इमारतीच्या खिडक्या आणि गॅल-यांमध्ये प्रचंड गर्दी केली. तब्बल ६०-७० वर्षे जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर, दुकानाच्या पत्र्याच्या छपरावर आणि पहिल्या मजल्याच्या गॅलरीत प्रमाणापेक्षा जास्त नागरिक दाटीवाटीने उभे होते. अतिरिक्त भार आल्यामुळे अखेर गॅलरीचा काही भाग आणि त्याला लागून असलेला दुकानाच्या छताचा पत्रा कोसळला. गॅलरीतले लोक खाली पडले. या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. एक लहान मुलगा, महिला आणि तीन पुरुष जखमी झाले. अनेकांना किरकोळ जखमा झाल्या.
पोलिसांनी जखमी झालेल्यांना केइएममध्ये दाखल केले आणि किरकोळ जखमींना घटनास्थळीच तातडीने वैद्यकीय मदत दिली.
अपघाताच्या धक्क्यातून सावरण्याआधीच भारतमाता पासून काही मिनिटांच्या अंतरावर चिंचपोकळीतील गणेश टॉकीज येथे तेजूकाया गणपती मंडळाची गणेश मूर्ती कोसळली. हा प्रकार कसा झाला ते अद्याप समजलेले नाही. मात्र मूर्ती अंगावर पडल्याने दोनजण जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना विसर्जन मिरवणुकीत नियमांचे पालन करण्याचे आणि स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य:मटा ऑनलाइन
No comments:
Post a Comment