भाऊंनी आपला मुलगा रामचंद्र याला मूल होणार या आनंदात १८४५ मध्ये घरी गणपती आणण्याची परंपरा सुरू केली . २०० वर्षांपूर्वी १८४५ ते १८९५ दरम्यान गिरगावात , १८९६ ते १९३५ परळ आणि १९३६ पासून आतापर्यंत प्रताप मॅन्शन , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मार्ग , दादर टी . टी . येथील घरात सहा पिढ्यांनी गणपती आणण्याची परंपरा जपली आहे . गणपतीचा चौरंग , समया , पूजेची भांडी हे साहित्य वंशपरंपरागत चालत आलेले आहे . पूजेतील पंचामृताची भांडी औरंगजेबाचे मुलगे आज्जमशाह आणि कामबक्ष यांच्या काळातील चलनी नाण्यांना चांदीचे जोडकाम देऊन बनवण्यात आली आहेत . गणपतीमागचा आरसाही १०० वर्षांपूर्वीचा आहे . विश्वास नारायण अजिंक्य हे भाऊंचे सहावे वंशज गणेशोत्सवाची ही वैभवशाली परंपरा जपत आहेत .
हजार नाण्यांचा संग्रह
अजिंक्य यांच्या घरच्या संग्रहात धनाच्या पेटीतून वंशपरंपरेने आलेली शिवकालीन , होळकर , बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड , ब्रिटीशकालीन अशी एक हजार नाणी आहेत . १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी कपाटे , बिजागरावर ' मेड इन विन व्हिक्टोरियन लंडन ' लिहिलेले शिसवी लाकडाचे जुने पेटारे , पोर्तुगीज खेळणी अशा अनेक पुरातन वस्तू अजिंक्य कुटुंबीयांच्या संग्रही आहेत . स्वत : भाऊ , मुलगा रामचंद्र व नातू विनायक अशा तीन पिढ्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना प्रत्यक्ष भेटल्या असून स्वामींनी १८७० मध्ये स्वहस्ते दिलेल्या चर्मपादुका अजिंक्य यांच्या घरात आहेत .
भाऊ रसूल नावाचा इतिहास
तत्कालीन धाकट्या कुलाब्यात १८२३ मध्ये सुरू झालेल्या ' गन गॅरिएज फॅक्टरी ' मध्ये लक्ष्मण अजिंक्य नोकरीस होते . कॅप्टन रसेल हे तेथील त्यांचे वरिष्ठ होते . कारखान्यातील एका मजुराला क्षुल्लक कारणावरून काठीने झोडपून काढण्याची शिक्षा वरिष्ठांनी दिली होती . त्यात लक्ष्मण यांनी हस्तक्षेप करून ती रद्द केली . त्यामुळे कामगार आदराने त्यांना भाऊ म्हणू लागले . रसेल यांच्याशी असलेल्या स्नेहाच्या संबंधामुळे पुढे ते भाऊ रसूल या नावाने ओळखले जाऊ लागले .
No comments:
Post a Comment