Friday, March 16, 2012

प्रतीक्षा संपली, सचिनचा 'शतकोत्सव' साकारला!


मटा ऑनलाइन वृत्त । मीरपूर

...अन् आपल्या सचिननं क्रिकेटविश्वात आणखी एक इतिहास रचला. जगभरातील क्रिकेटवेडे वर्षभर ज्या क्षणाची आतूरतेनं वाट पाहत होतं, तो सचिनच्या ‘ शतकोत्सवा ’ चा क्षण आज बांगलादेशात साकारला आणि हा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवताना सारेच कृतकृत्य होऊन केले. ‘ महाशतक ’ साकारल्यानंतर बॅट आणि हेल्मेट उंचावून आकाशाकडे पाहत सचिननं देवाचे आभार मानले, तेव्हा क्रिकेटच्या या देवाला सा-यांनीच सलाम केला.

क्रिकेटविश्वाचा अनभिषिक्त सम्राट, अनेक विक्रमांचा बादशाह असलेल्या सचिन तेंडुलकरला त्याच्या कारकीर्दीतलं शंभरावं शतक वर्षभरापासून हुलकावणी देत होतं. १२ मार्च २०११ ते १५ मार्च २०१२ या काळात इंग्लंड दौरा झाला, वेस्ट इंडिजविरुद्धची मायदेशातील कसोटी मालिका झाली, भलामोठा ऑस्ट्रेलिया दौरा झाला, पण सचिनच्या ‘ महाशतका ’ साठी काही मुहूर्त सापडत नव्हता. दोनदा तर नव्वदीच्या घरात जाऊनही सचिनच्या पदरी निराशा पडली होती. तमाम क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा सामन्यागणिक वाढत होत्या आणि लिटिल मास्टरच्या खांद्यावरचं ओझं जड-जड होत होतं. पण आज आशिया कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात, झालं गेलं सगळं विसरून, सगळी बंधनं झुगारून देत सचिन बिनधास्तपणे खेळला आणि शेरे बांगला स्टेडियमवर भारताच्या या ‘ वाघा ’ नं डरकाळी फोडली.

बांगलादेशच्या शकील अल् हसनचा चेंडू हलकेच टोलवून सचिन तेंडुलकरनं शंभरावी धाव घेतली, तेव्हा सारं स्टेडियम, पॅव्हेलियन ‘ उसळलं ’ . पण सचिनच्या चेह-यावरची धन्यता, समाधान केवळ अवर्णनीय होतं. सुरेश रैनासह बांगलादेशच्या क्रिकेटपटूंकडून शुभेच्छा स्वीकारतानाच, त्यानं आपलं हेल्मेट काढलं आणि बॅट उंचावून डोळे मिटून आकाशाकडे पाहत देवाचे आभार मानले. सचिनचा आनंद त्याच्या डोळ्यात तरळत होता आणि तो पाहून त्यांच्या चाहत्यांनाही गदगदून आलं.

कसोटी आणि वनडे किक्रेटमध्ये सर्वाधिक धावा सचिनच्या नावावर जमा आहेत. त्यात ५१ कसोटी शतकांचा समावेश असून त्याचं आजचं शतक वनडेतील ४९वं शतक ठरलं. १३८ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं सचिननं हा महापराक्रम केला. बांगलादेशविरुद्धचा सामना म्हणजे सचिनला आपलं बहुप्रतिक्षित शतक साकारण्याची नामी संधी असल्याचं क्रिकेटवर्तुळात बोललं जात होतं. त्यामुळे मास्टर ब्लास्टरवरचा दबाव अधिकच वाढला होता. परंतु, पहिल्या चेंडूपासून तो अत्यंत नेटानं, आत्मविश्वासानं, जिद्दीनं खेळला. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर, ८० ते १०० या टप्प्यात सचिननं अत्यंत सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यातच अर्धशतकवीर विराट कोहली तंबूत परतल्यानं सचिनवर दबाव आणखी वाढला होता. पण, या धक्क्यानं जराही न डगमगता तो पीचवर टिच्चून उभा राहिला आणि ‘ महाशतका ’ चं स्वप्न साकार करून त्यानं आपल्या ‘ भक्तां ’ ना प्रसन्न केलं.

आशिया कपमधील आजचा सामना अविस्मरणीय करणारा सचिन ११४ धावांवर बाद झाला. शतकानंतर त्यानं फटकेबाजी सुरू केली होती, पण मश्रफी मूर्तझानं त्याला चकवलं. सचिनचं ऐतिहासिक शतक आणि कोहली-रैनाच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं बांगालदेशपुढे २९० धावांचं आव्हान ठेवलंय.

Tuesday, March 6, 2012

होळी का साजरी करतात ?

पिंकी:- आजोबा होळी का साजरी करतात ?

आजोबा :- बेटा कारण, भक्त प्रल्हाद हा नेहमी नारायणाचे ध्यान करायचा, पण त्याचे वडील जे हिरण्यकषप्यू त्यांना हि गोष्ट बिलकुल आवडायची नाही, त्यामुळे ते प्रल्हादावर भरपूर अत्याचार करायचे व त्यास मारण्याचे भरपूर प्रयत्न करायचे, पण नारायणाच्या कृपेने भक्त प्रल्हाद नेहमी सुखरूप रहायचा, हे बघून एके दिवशी हिरण्यकषप्यूने आपली बहिण होलिका हिला, "प्रल्हादाला घेऊन आगीत उडी टाक, म्हणजे जाळून तो खाक होईल !!" असा आदेश दिला ( होलिका ला आगी मध्ये न जळण्याचा वर मिळाला होता, त्यामुळे तिला आगी पासून काहीच धोका नव्हता ) ...... नंतर होलिका ने प्रल्हादाला मांडीवर घेतले व भीषण आगीमध्ये उडी टाकली, परंतु देवाच्या भक्ताचे छळ केल्यास तुमच्या पापांची घटिका भरून येते व मिळविलेले सर्व पुण्य वाया जाते, ह्या शिकवणीची जाणीव सर्वांना सदैव रहावी म्हणून देवाने तो वर मागे घेतला व होलिका त्या आगी मध्ये जाळून खाक झाली ........... आणि नारायणाच्या कृपेने प्रल्हाद पुन्हा एकदा सुखरूप पणे आगीतून बाहेर आला.
म्हणून साधू, संताना, भक्तांना तसेच अशक्त लोकांना त्रास देऊ नये व नेहमी नारायणाचे स्मरण रहावे ह्यासाठी होळी हा सण साजरा कला जातो !!

पिंकी :- धन्यवाद आजोबा, मी नेहमी देवाचे नांव घेत जाईन.

Happy Holi :)